ई-मेल : info@amhiparchure.com
भ्रमणध्वनी: ९९७०३४२७६१

   परचुरे कुलप्रतिष्ठान   


सर्व परचुरे कुलबंधु व भगिनींना विनम्र अभिवादन

सन 2010 मध्ये परचुरे कुलाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले. त्यावेळेस तटपुंजी साधने उपलब्ध असताना सुद्धा श्रीराम त्रिंबक परचुरे व त्यांना मदत करणाऱ्या असंख्य जणांनी अपार कष्ट घेऊन परचुरे कुलवृत्तान्तची पहिली संगणकीय आवृत्ती 2012 मध्ये प्रसिद्ध केली. अशाच प्रकारे पुढच्या दोन छापील आवृत्या प्रकाशित करण्यात आल्या. आज आपल्याला संगणकीय करणाचा पर्याय उपलब्ध आहे आपल्या परचुरे कुटुंबात संगणक शास्त्रात प्रवीण असणारे अनेक जण आहेत त्यांच्या मदतीने प्रत्येकाला आपली माहिती दुरुस्त करणे अद्ययावत करणे सोपे होणार आहे त्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी तरुण परचुरे मंडळींनी एकत्र येऊन आज ही वेबसाईट सर्व कुल बंधू आणि भगिनींसाठी उपलब्ध करून दिली आहे. हे काम करताना अजाणतेपणी कोणाची माहिती भरण्याचे राहून गेले असल्यास अथवा काही त्रुटी असल्यास आम्हाला संपर्क करावा. या साईट मध्ये आपल्या परचुरे कुटुंबातल्या सर्वांचा समावेश केला गेला आहे आपल्याला जर काही माहिती, ब्लॉग किंवा आपल्या व्यवसायाबद्दल माहिती इथे नमूद करावयाचे असल्यास श्रीराम त्र्यंबक परचुरे पुणे यांना संपर्क करावा.

इतिहास :

1910 नंतर कुलवृत्तांत या विषयाकडे अभ्यासकांचे लक्ष गेलेले आढळते. या कार्यसेवेच्या आरंभीचे श्रेय श्री. गोविंद विनायक आपटे यांचेकडे जाते. त्यांनी 1914 मध्ये सुमारे 192 पृष्ठांचा "बर्वे घराण्याचा इतिहास भाग 1" प्रसिद्ध केला तेव्हापासून इसवी सन 2000 पर्यंत महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील ऐतिहासिक घराण्यांनी विविध प्रकारे कुलवृत्तांत प्रसिद्ध केले आहेत. आज सुमारे 150 कुलवृत्तान्त महाराष्ट्रात प्रकाशित झालेले पहावयास मिळतात. कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण समाजाने अशा ग्रंथ प्रकाशनास काही अंशी तरी प्रारंभ केला हे खरेच. कुलावर आधारित सामाजिक इतिहास व घराणे यांचे स्थान निश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न काही अंशी तरी उपयुक्त ठरला आहे. व्यक्ती, कुटुंब, घराणे, वास्तव्यस्थान इत्यादी अनेक बाबतीत या ग्रंथामुळे अभ्यास व शोध करणे सोयीचे होऊ शकते. आता अशा ग्रंथात परचुरे कुलवृत्तांत ही उपयुक्त ठरणार याचे समाधान वाटते कुलवृत्तान्त ग्रंथ निर्मितीचे निश्चित असे शास्त्र वा पद्धती अजून तयार झालेली नाही. ग्रंथ करत्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणतः अशा ग्रंथात शाखानिहाय वंश उल्लेख आणि व्यक्तींचा संक्षिप्त परिचय असतो. कोकण म्हणजे सागर व निसर्ग यांचे अतूट नाते. या भूमीवर आपले प्रेम आहे. आपले वंशज येथूनच विश्वात सर्वदूर पसरले. गुहागरचे प्राचीनत्व सांगणे तसे कठीणच. येथील गुहातून अश्मयुगीन हत्यारांचा शोध लागला त्याचा काळ एक लाख वर्षापूर्वीचा निश्चित झाला आहे. अपवाद सोडला तर परचुरे कुळांच्या सर्व घराण्यांचे दैवत श्री व्याडेश्वर, गुहागर आणि श्री योगेश्वरी, अंबाजोगाई अशी दोन कुलदैवते व मुख्य ग्राम गुहागर मानले आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी गुहागर होऊन परचुरे कुटुंबे देशावर का गेली असावीत हे कळायला मार्ग नाही.